मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

थेंब ओल्या श्रावणाचे ...


थेंब ओल्या श्रावणाचे प्रीत शिंपण जाहले
प्रेम हळव्या आठवांचे गीत गुंफण जाहले   || धृ ||

गंधवारा पाकळीचा स्पर्शुनी जातो जसा,
तू तशी माझ्या मनाला हर्षुनी गेलीस कुठे ?
भास होती का तुझे अन वेदना हृदयी उठे,
चाहुलीचा वेध घेता हरवती का पाऊले ?   || १ ||

का अजूनी हिंडतो मी, बावरासा काहीसा ?
का अजूनी स्वप्नपंखी, तू स्वतःशी रंगते ?
पावसाने आठवांची वाट ही ओलावते,
आणि वाटे का तुझ्याशी बोलणे ते राहिले ? || २ ||

- अनुबंध


मंगळवार, २६ जुलै, २०१६

देणाऱ्याने देत जावे


देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
देणाऱ्याने देता देता
घेणाऱ्याचे हात घ्यावे

घेणारा आहे स्वाभिमानी
की आहे घेऊपासरी
देणाऱ्याने देता देता
घेणाऱ्याला ठेचत जावे

देणाऱ्याने देत जावे
न विचारता देत जावे
देता देता देणाऱ्याने
घेणाऱ्यावर आरुढ व्हावे

घेणाऱ्याने घेत जावे
ठेवून दगडाखाली हात
ब्र काढणे गुन्हा आहे
घेणे म्हणजे झाला पात

देणारा ही देत जातो
घेणारा ही घेत जातो
चालत राहे असे जोवर
घेणारा त्याचे सर्व ऐकतो

दिवस एक येतो जेव्हा
घेणारा उंच करतो मान
देणारा ही ऐकवतो मग
उपकाराची मोठी तान

घेणाराही  चिडून आता
दगडाखालचे काढतो हात
निघून जातो करून गोळा
देणाऱ्याला मारून लाथ

- अनुबंध 

गुरुवार, १४ एप्रिल, २०१६

मन पुन्हा चुकते जरासे


पाहताना वाट तुझी मी, ऊनही हसते जरासे
चार क्षणांची भेट जरी ही, चांदणे झुकते जरासे

पाऊस वारा,थंड शहारा
ओली हिरवळ, क्षितीज किनारा
ऋतू बदलणे, फुल उमलणे
सहजच सुंदर सुचते गाणे
तेच असे जरी सभोवताली, भासते का मला नवेसे ?

सांज धुक्यातून अलगद येते
लालगुलाबी  रंग ती भरते
वेळ सरते तरिही उरते
मिठी अशी का गं सुटते
थांबणे कळते तरिही, मन पुन्हा चुकते जरासे !

- अनुबंध 

बुधवार, २० जानेवारी, २०१६

सुखाची चौकट


एक नर एक मादी
त्यांना हवी एक गादी
मुलं व्हावी छान छान
दिसावी कशी गोरी पान

एक मुलगी प्रेमापोटी
एक मुलगा वंशासाठी
घर हवे स्वत:चे
वाहन हवे इंद्राचे

मुलगा शिकला खूप खूप
मुलीचे तर काय रूप !
त्यांना मिळो हीच सुखे सारी
त्यांचीही व्हावी चौकट पुरी

ज्यांची असे चौकट पुरी
त्यांनीच ह्या चौकटीत रहावे
बाकीच्यांनी आस लावूनी
बाहेरूनच आत पहावे

कोणी येता चुकून आत
उण्यावरती ठेवू बोट
उघडे अंग झाकण्यासाठी
उसना घेवूनी घाला कोट

ज्यांची चौकट असे अधुरी
त्यांची चुकली असेल वारी ?
त्यांनी आता करावे काय ?
धरावे देवाजीचे पाय !

करूनी देवाधर्माचे
भोग जळतील कर्माचे
दोष जातील झडून
दु:ख जाईल पळून

चौकटीचा राजा होण्यासाठी
प्रत्येकजण झटत असतो
खरा मात्र जो चौकटराजा
चौकटीत राहून, चौकटीत नसतो

- अनुबंध

बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

वेडाबाई घरी ये गं


तू फक्त घरी ये गं
मी जगासारखं कुठल्याही प्रकारे
तुझं मुल्यमापन करणार नाही
तुला कुठल्याहीप्रकारचं स्पष्टीकरण द्याव लागणार नाही
तुला बोलावसं वाटलं तर बोल
नाही तर नुसतीस - अस
ह्या घरातल्या सुहृद स्पंदनांच्या कुशीत तुला शांत नीज येईल
तू पाहिजे तितक्या  दिवस रहा, स्वत: होवून
काळ आणि व्यवहाराचे पाश विसरून
मला खात्री आहे कि तुला ज्याचा शोध आहे
ते तुला नक्कीच सापडेल
आणि
पुढचा आश्वासक असा मार्ग आलिंगनाचे हात घेवून तुझ्यासमोर उभा राहिल …

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत ……
व्हरांड्यात पक्षी येतात …… चिवचिवाट करतात …. दाणे पाणी टिपतात …
आणि पुन्हा अनंत आकाशांत उडून जातात ....

वेडाबाई घरी ये गं, पाहते मी वाट,
करून सारे आवडीचे, ठेवते मी ताट

वेड्याश्या मायेने गं, भरून येते ऊर,
तपं दोन झाली तुला, जाउनिया दूर

बोलावेसे वाटले तर, बोलशील खूप,
नाहीतर मुक्यापरी बसशील  चूप

पिल्लू माझी सोसते, व्यवहाराचे घण,
डोळे तुझे सांगतात, मनावरचे वण

नाही बाई तुला काही विचारणार नाही,
जुनंपानं उकलून काढणार नाही

वेडाबाई घरी ये गं, वेडी तुझी माय,
फुटलेल्या गालांवरती लावीन मी साय

- अनुबंध

सोमवार, २२ जून, २०१५

सत्कार !


लोक पुसती कारणे, माझ्या कपाळी आठीचे,
उत्तरे नाही मिळाली, प्रश्न झाले साठीचे.

ह्या जगी मी हिंडताना, भिन्न स्नेही जोडले,
सभ्यतेला नाव आहे, आतल्या त्या गाठीचे.

सोयिने  भांडून गेले, गोड ही ते बोलले,
काय होते आतले, अन काय होते ओठीचे ?

पावसाळे सोसुनी, उरलो जरी मी जाणता,
वार होते झोंबणारे, जाणिवेच्या काठीचे.

जाहला सत्कार माझा, खूप होते लोक ही,
शाल त्यांची झाकते का, घाव माझ्या पाठीचे ?

- अनुबंध 

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१३

फुलराणीचा पाळणा


झुलवुनिया पाळणा, गाऊया गं गाणी            
सजलेल्या ह्या पाळण्यात, निजते फुलराणी         || धृ ||

आषाढाचे मेघ दाटता, भरले नवमास,      
सानुली जणु परीच आली, दिवस पाहूनी खास            
साखर वाटत फिरू लागला, बाबा अनवाणी           || १ ||

इंवले इंवले डोळे, न्याहाळती जग सारे,
तुला निजविण्या घालावे, किती गं येरझारे,
सानसुखाची आई तुजला सांगे कहाणी                || २  ||

लुटुलुटु पाउले टाकीत, धावेल धिटुकली
काऊचिऊच्या संगे, मंमं करेल चिमुकली
भातुकलीचे खेळ, रंगतील अपुल्या अंगणी           || ३ ||

उंच उंच आकाशामध्ये, घेवून भरारी,
विद्या कला संस्कारांनी भर तू तिजोरी
ताऱ्यासम तू लखलखशील, ही असे देववाणी        || ४ ||

जन्म बाईचा जरि सुखाचा, परि नसे हा सोपा,
धागा करुनी आतडीचां, लागे विणावा खोपा,
आई यमाई देईल तुजला बुद्धी शहाणी                 || ५ ||


- अनुबंध 

रविवार, ९ जून, २०१३

उजाडून आले !


उजाडून आले आता उजाडून आले
खेळणाऱ्या पाखरांना उजाडून आले

खेळणारी पाखरे गेली आता दूर
अंधारात उरल्यांच्या डोळा उरे पूर

उजेडात शिरताना केवढा आनंद
मुक्ततेला मुक्ततेचा लागलासे छंद

प्रत्येकाला वेगवेगळे उजाडून आले
खेळणाऱ्या पाखरांचे जमेनासे झाले

प्रत्येकाला गवसला वेगळा गंधार
भासला उजेड, परि निघाला अंधार

गंधारचे गंधाराशी जुळेनासे झाले,
तरी वाटे प्रत्येकाला उजाडून आले

- अनुबंध

शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२

ओलावा ...


डोळ्यांतूनी टिपूसही मी ढाळत नाही,
आतल्या आत अश्रू कधी का वाळत नाही?

ओलावा हा सतत वाहतो काळजात ह्या,
फिरणाऱ्या ऋतुचक्रां का तो पाळत नाही?

दूर पांगल्या आपुल्यांची घुमते आठवण,
वेदनेस ह्या स्नेह कधी का टाळत नाही?

भलत्यांपाठी फिरते झुरते वेडे मन हे,
रीत जगाची हसत हसत का माळत नाही?

फरफट होता दु:ख जाहले गझलेत गोळा,
सौख्य आजचे गझलेस ह्या का जाळत नाही?

- अनुबंध

शुक्रवार, ८ जून, २०१२

अशी संध्याकाळ येवोनिया जाते .......


संध्याकाळ होता,
लागतात दिवे,
जाती घरट्यात,
पाखरांचे थवे

क्षितीज मेंदीचे,
शून्यात लोपते, 
दमलेली आशा,
वाटेत झोपते 

डोंगर दूरचे,
काळोखात न्हाती,
गाणे अंधाराचे,
रातकिडे गाती

ढगांची झालर,
चंद्रा झाकोळते,
दरीतल्या गावा,
कुशीमध्ये घेते

घाटाघाटातला,
चाकांचा प्रवास,
पांगलेल्या देहा,
आणतो  घरास

घर नसल्यांना,
कुणाचाच मोह ?
बोटांनी शोधिती,
परान्नात स्नेह

नांगर टेकता,
जमे पिल्लावळ,
येई कुणब्याला,
प्रेमाची भोवळ

पत्र्याच्या दुकानी,
मद्याचे आगर,
रातभर चाले,
व्यसनी जागर

टाळ ढोल आणि,
पेटीचा आवाज,
करी माळकरी,
भजन रियाज

शेणोरी अंगणात,
टाकोनिया खाट,
जुनं खोड पाही,
गरुडाची वाट

अशी संध्याकाळ,
येवोनिया जाते,
गावास रात्रीच्या,
ओंजळीत देते

विझे दिवा दिवा,
सरे धामधूम,
दंगलेला गाव,
निजे सामसूम  .........    दंगलेला गाव निजे सामसूम


-  अनुबंध

मंगळवार, ८ मे, २०१२

अक्षता


तू तशी सजशील जेव्हा, मी तुला पाहीन दुरुनी
साजरी प्रतिमा तुझी, घेईन मी डोळ्यांत भरुनी.

आपुले क्षण सोबतीचे, सांग का ते भास होते ?
कोवळे अनुबंध होते, की कशाचे फांस होते ?
गंध ते हळवेपणाचे, बोलल्या शब्दास होते.
गुतंलो जणु एवढे की, वेगळे ना श्वास होते.
का सये उजवून सारे, तू अशी गेलीस फिरुनी ?

शोधतो हरवून काळोखात आता बंद दारे
अंतरा उकलून गेले अस्तणारे चंद्रतारे  
सागरी मिसळून पाणी साचते डोळ्यांत सारे
सांगती मज हुंदके तालात ह्या, तू गीत गा रे
मानसी वसतेस का, का जात तू नाहीस विरुनी ?

काढली समजूत मी नादावल्या वेड्या मनाची,
माझिया नजरेत आता, तू अबोली त्या बनाची
सांगना चुकली कधी का वाट कोणा प्राक्तनाची ?
झाहली विरहात पूरी ही कहाणी मोचनाची
एकदा तुजला बघाया, अक्षता आणीन घरुनी !

 - अनुबंध

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

अजून फक्त पाच मिंट ...


अजून फक्त पाच मिंट, मला झोपू दे,
झोपेचे सुख, अजून जरासे, मनात साठवू दे !

स्वप्नामध्ये भिरभिरणारे, मुक्त मुग्ध हे मन,
स्थळ-काळ वेळाचे सारे, तोडूनी बंधन,
कशाचेही कुणाशीही, जोडत असते नाते,
एकामधून दुसऱ्यामध्ये, रमत गमत हे जाते.
शेवटचे एक, स्वप्न अपुरे, पूर्ते करू दे !
काय होते स्वप्न ते, जरा आठवू दे ! .... अजून फक्त पाच मिंट ...

सुरु आहे, पांघरूणाखाली, काहीसे चिंतन,
चार विचार डोक्यात घेउनी, करु दे जरा मंथन.
विचारांचा जाणिवांशी, बसतो आहे मेळ
आयुष्याचे मर्म गवसण्या, हीच आहे वेळ
सुखी अशा, जीवनाचा आज, मार्ग सापडू दे !
सारेच प्रश्न, एकदाचे का, सोडवून टाकू दे ! .... अजून फक्त पाच मिंट ...

तेच तेच करून पुन्हा, बदलेल का काही ?
घड्याळाचा काटा नुसता फिरतच राही !
रियालिटी शो, आयुष्याचा सुरु झालाय खरा,
चानेल हा, लावतो मी, थोड्या वेळाने जरा !
हा रहाटगाडा ओढायाचे बळ एकवटू दे !
पुन्हा नव्याने माझ्यासाठी सकाळ उजाडू दे ! .... अजून फक्त पाच मिंट ...


- अनुबंध

गुरुवार, १६ जून, २०११

ओढून रात्र ...


ओढून रात्र, झोपले दमून गाव
झोपेतही घेती, श्वास सुखाचा ठाव

ओसरून गर्दी, असे चकाकती रस्ते
ह्या रस्त्यांची, समजेना, कुठवर धाव

निजे बाळ चिमुकले, आईच्या कुशीत
धगधगत्या उशीत, भीतीला मज्जाव

एकटे झुरे कुणी, मनीच्या काहूरात,  
रतिसुखात रंगे कुणी, मांडूनी डाव

ती नार पुसे, देवास, हिरव्या कोठीत
का मिठीत माझ्या, रोज अनोळखी राव?

मुटकुळीत त्याच्यासंगे, निजली बाटली
झाकितो, विकुनी पाटली, मनीचे घाव

सामान्य अशी, जाणीवही निजते जेथे
नेणीव तिथे, आणते, पुण्याचा आव

स्वप्नात कधी, असे दु:खस्थळांवर न्यास
मिळे हव्याहव्याशा, सुखांनाही वाव

उजळून निरांजन, मिटले जाळीदार
विश्वाचा भार, पेलतो, भक्तीचा भाव


- अनुबंध

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

कळी अबोलीची ...

ओल्या श्रावणाचा रंग, पसरता भवताली 
मनातल्या स्वप्नांची त्या, कळी अबोलीची झाली        || धॄ ||   

तिला पाहता मनीचा, उजळतो शुक्रदीप,
जग विसरून मन, राहते तिच्या समीप,
स्पर्शाविना स्पंदनांची, जादू ही सुगंधलेली !                || १ ||

मना सोसवेना आता, एकटेपणाची सल,
काळ्याभोर डोळ्यांनी त्या, मला घातली गं भूल,
भान, अवधान माझे, घेऊनी कशी उडाली ?               || २ ||

तिच्याशीच बोलतो मी, माझ्याशी मी बोलताना,
अन तिने हळूवार, समजूत काढताना,
दोन पावलांची वाट, चार पावलांची झाली !                 || ३ ||

 - अनुबंध


सोमवार, २८ जून, २०१०

आला पाऊस गावात


आला पाऊस गावात
झाली दिवसाची रात
आणि अंधाऱ्या घरात
जळे दुपारची वात

आला पाऊस गावात
वारा सुटला जोरात
शीळ घालीत सुरात
निघे पानांची वरात

आला पाऊस गावात
वाजे ढगांचा नगारा
झाले पक्षी सैरावैरा
कुठे शोधती निवारा  ?

आला पाऊस गावात
त्याची आगळीच भाषा
ओढी नभावर रेशा
वाजे छतावर ताशा

आला पाऊस गावात
लव्हाळली ओली माती
नवकुसुमांच्या ज्योती
झाडाझुडपांच्या हाती

आला पाऊस गावात
दिसू लागली गांडूळे
लाल पैशाचे वेटोळे
किड्यामुंग्याचे सोहळे

आला पाऊस गावात
पाणी खेळले पाटात
धान्य रूजले शेतात
मोद मावेना उरात

आला पाऊस गावात
ज्वानी पडली प्रेमात
पावसाळी ह्या ज्वरात
आली नवती रंगात

आला पाऊस गावात
आला  कुणा न सांगता
त्याला पाहता पाहता
सुचू लागली कविता


 - अनुबंध

बुधवार, १९ मे, २०१०

आनू कुटला उतारा?


निज माज्या तान्या,
आता उतरलं ताप,
कोन करते करनी,
तेला लिंबाईचा शाप

रडू नग तान्या,
तुला चांदो दाविते,
गनीबाबाचा अंगारा,
तुज्या अंगी लाविते.

कुन्या भुत्याचीच बादा,
जवा असता अवस,
जाडाखालच्या वेतूला,
केला हाय म्या नवस.

देवळात हनम्याच्या,
घातलं हाय तेल,
रानातल्या शंकराला,
बी दिला हाय बेल.

कालीज तुज्यामंदी,
बापाचा एरजारा,
मी जाले एडीपिशी,
आनू कुटला उतारा?

रात सरलं ही आता,
असं रडायाचं न्हाई,
तुजं कपाल कोरन्या,
पुना एनार सटवाई.

- अनुबंध

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

हा सोहळा कशासाठी?


सोहळ्यात आम्ही जगतो,
सोहळ्यात आम्ही मरतो,
सोहळ्यात पुन्हा उगवतो,
सोहळे करण्यासाठी.

कुणी आल्याचा सोहळा,
मूल झाल्याचा सोहळा,
कुणी मेल्याचा सोहळा,
गर्दी करण्यासाठी.

येती पौराणिक सोवळे,
येती आधुनिक ओवळे,
आणि मधले ढोमकावळे,
फक्त जेवण्यासाठी.

कोण होता तो प्रेषित?
की स्वातंत्र्यसैनिक?
आम्ही आपुले यांत्रिक,
जमतो नाचण्यासाठी.

असता देवाचे सोहळे,
घालूनी मांडव वेगळे,
फिल्मी गाण्यात सगळे,
म्हणतो हे देवासाठी.

सोहळ्यात दु:ख विसरतो
सोहळ्यात सुख विसरतो
सोहळ्यात हेही विसरतो
हा सोहळा कशासाठी?


- अनुबंध

सोमवार, १ मार्च, २०१०

वसंत कळतो आहे


शिखरांवरती साठलेला, बर्फ आज गळतो आहे,
कळ्यांमध्ये थांबलेला, वसंत आज कळतो आहे.

पाचोळ्यावरती साचलेल्या, वृक्ष आहे नागवा,
खेळणा़ऱ्या पाखरांचे, गीत आज स्मरतो आहे.    

जलदांमागे लाजणारा, आदित्य हा संदिग्धसा,
हलक्याहाते अणुरेणूने, रंग आज भरतो आहे.   

शिशिरागम होता वाटले, संपले चैतन्य आता,
वाळला कुसवा मृगाचा, जीव आज धरतो आहे  

सानथोर जीव सारे, मागती अभयाचे आंदण,
गोठलेल्या धरित्रीचा, नवस आज फळतो आहे.


- अनुबंध

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

परतून घरी गेल्यावर


परतून घरी गेल्यावर, माणसे 'माणसे' होती,
डोळ्यांत ओळखीच्या का, प्रतिबिंब पोरकी होती?

मी त्याच निरागसतेने, भेटाया गेलो जेव्हा,
मज थांबवणारी तेव्हा, शांतता बोलकी होती.

ह्रदयात साठले ओझे, बोलावे कोणासंगे?
माझेच रक्त गिळणारी, रोहिणी फाटकी होती.

जे वाटत होते माझे, वाटून संपले होते,
अन आठवणींवर सुद्धा, दुसऱ्यांची मालकी होती.

चेहरे नवे हे आता, रोवून नव्या ह्या भिंती,
घुसमटली मने त्यांची, मायेस पारखी होती.

घुमणारा गंध पुराणा, कोण आहे अंधारात?
पाळण्याची दोर माझ्या, घेऊन देवकी होती.

- अनुबंध

शुक्रवार, १ जानेवारी, २०१०

पुन्हा वाजवूनी पावा


पिवळा केशरी लाल,
तुझा गुलाल,
दिगंतावरती.

उंच उधळले पक्षी,
जाहली नक्षी,
अंबरावरती.

मातीचे फुटले पाय,
रोडली गाय,
तापली धरती.

ग्रीष्मात जळाले रान,
पोरके श्वान,
उपाशी फिरती.

देहाचे संपता बळ,
सोसेना कळ,
माणसे गळती.

अन्न उगवूनि पाप,
लागला शाप,
जन्मी ह्या जगती.

भुकेतच होई अंत,
तुला न खंत,
वेदना कळती ?

पारोसा तुही देऊळी,
एकही कळी,
तुझ्या न पुढती.

होवून कधी हे शुभ्र,
सुनील अभ्र,
लागेल झरती ?

पुन्हा वाजवूनी पावा,
नदीला देवा,
आण  तू  भरती.

पुन्हा वाजवूनी पावा........नदीला देवा, आण  तू भरती...


- अनुबंध

बुधवार, २ डिसेंबर, २००९

उंदीर पळत नाही !


लहान असता, धडपडल्यावर, फुंकर मारी आई,
आलामंतर, कोलामंतर, उंदीर पळून जाई.

वय वाढता, समज वाढता, ‘बाऊ’ मोठा होई,
वारा घालून, लाथ मारून, उंदीर पळत नाही.

नसलेले जे मनासारखे, मनास बिलगून राही,
त्याची होवून उदासीनता, आनंदाला खाई.

खंत धुसमुस, नात्यांमधली, वसा मनाचा घेई,
सोडून सगळे, दूर पळावे, पण सोडवत नाही.

'आलिया जे भोगासी', ते स्वीकारायचे नाही,
देवळातली रांग मोठी, देते का ह्याची ग्वाही ?

राहूकेतु, शनि मंगळाला, ‘मी’ घाबरून जाई,
देवदैव नि प्रयत्नाहून, ज्योतिष मोठा होई !

व्यंग-विफलता, जरी असती, नियतीच्या ठाई,
आशेचा एकच नंदादीप, जगण्याला बळ देई.

हास्य ठेवूनी वदनावर, हा प्रवास सुखकर होई,
मात्र पाहिजे, अढळ श्रद्धा, त्या अरुपाच्या पायी.

- अनुबंध

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २००९

चंद्री


चंद्राचा प्रकाश गळून,
येतो खिडकीतून आत,
स्वप्नील माझी तुटते तंद्री,
लागते चंद्री, जळते वात.

भोगलेले सोसलेले अन,
डांबलेले जे जे मनात,
गोष्ट होऊन त्याची विचित्र,
ठोका चुकविते स्वप्नात.

चांदण्यातल्या भिंती चार,
पानांच्या सावल्यांचा खेळ,
बोटांची हरणे त्यात चरती,
अस्वस्थ प्रहराची अस्वस्थ वेळ.

काळजीही वेळ साधून,
पोटातूनी येते दिठीत,
विकल्पं उठती मिटती,
रित्या जाहलेल्या कोठीत.

मनाच्याच तळाशी खळबळ,
जाणीव नसते चांदण्यास,
दूर चंद्राच्या खवल्यांत,
निजविते आई बाळास.

मंद्र स्वरांतील ती अंगाई,
मजला ऎकू येत नाही,
अंधार फाटूनी मित्र यावा,
तशीही अजून वळ नाही.

अन कुठेसे चाललेले दिसते,
एक विमान लुकलुकणारे,
आर्त मुकी हाक माझी,
मला घरी नेशील का रे?


- अनुबंध

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

बकुळ भिंगर्‍या .......बकुळ भिंगर्‍या, घेत गिरक्या, पाण्यावरती, पडल्या अलगद,
सांगत होत्या, जणु त्या मजला, कुणीतरी, येणार अवचित.

उगाच नाही, अवखळ वारा, मातुलल्या, फांद्यांना झुलवत,
त्यास वाटते, झोळीत तुझीया, सौरभ हा, व्हावा समर्पित.

तुझ्या ओठीच्या, त्या पूरियातील, अंतरे मी, गेलो विसरत,
मनी राहिले, आता ध्रुवपद, ते पुन्हापुन्हा, असतो आळवित.

यावेस तु, ह्या सांजधुक्यातून, तुझ्यामागची, वाट मालवत,
तुझ्यासाठी, ह्या गारठ्यात मी, वृक्षाखाली, उभा सदोदीत .

हलक्या हाते, तु फुले वेचिता, जरी व्हावी ही, भेट ओझरत
उमलावे, ओठांवर आपुल्या, संवाद काही जे, असती समीहित.

लाल केशरी, आभाळासंगे, सांजसावल्या परि, गेल्या सरकत,
वाट पाहुनी, बुडल्या भिंगर्‍या, पाण्याखाली, निजल्या निपचित.

- अनुबंध

मंगळवार, १ सप्टेंबर, २००९

पुरुषांचा पिंपळ .......वाळवंटी उगवले,
रोप पिंपळाचे,
नीर शोधण्यास गेले,
खोल मूळ त्याचे.

सोडूनिया माय काळी,
वाळूत रुजले
निवडुंगाच्या भूमिवर,
काय भाग्य ह्याचे ?

आसमंती झेप ह्याची,
दैव हे वेगळे,
मरुभूमीत नसता
पाउल जळाचे.

बसून पायाशी घेतले,
ऋण सावलीचे,
विचारता बोलू झाले ,
खोड त्या तरुचे.

" सांगतो तुजला मित्रा ,
गुपित हे माझे ,
मज भेटावया  येती,
पुरूष गावाचे

शेतावर, यंत्रावर,
राबणारे रावे,
पोटांसाठी सोसती हे ,
भोग ह्या जगीचे.

राबताना भरते जी ,
घागर मनाची ,
हाती घेउन शोधती
दार माहेराचे.

खांदा, पदर, मद्याच्या,
जाता पलीकडे,
दु:ख मोकळे कराया,
येती माझ्याकडे

सांगताना भोगलेले, नि ,
गूज जे मनीचे,
माझ्या कुशीत धाळती
ओघ आसवांचे.

मी न कोण विभुती,
देणे हे निसर्गाचे
माझी ही सावली आहे,
लेणे भवदु:खाचे."

- अनुबंध
शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

मनामध्ये अविरत ……..

परत परत तेच तेच, तेच तेच परत परत,
मनामध्ये अविरत, राहते फिरत फिरत.

तीच तीच माणसं, मनात जणू पाळलेली,
असताना, नसताना, बोलतात सतत सतत.

प्रसंग जुने झाले तरीही, आठवणी ओलसर,
शब्द पोचूनी खोलवर, राहतात झुरत झुरत.‍मन कोवळं मन हळवं, भावबंधांत असे भ्रमीत,
साहुनीच त्या उमगे रीत, आवंढे गिळत गिळत.

चुरगळते चादर मुठीत, हिरमुसलेला चंद्र कुशीत,
चांदण्यांइतुक्या रात्रीं, सरतात कण्हत कण्हत.

कधी काढत वाळूत रेशा, कधी बादलीत भोवरे,
वेधतो मनाचे कोपरे, मनानेच खणत खणत.मनाच्या ह्या भुयारात, दिले घेतलेले शाप,
त्यात किल्मिषांचे रोप, वाढते झुकत झुकत.

हुरुप येता जरा मनात, वर्म उकलते जनात,
अन फुले जगतात, पाकळ्या झडत झडत.

तरि उमेद साठवून, कळ्या पुन्हा उगवतात,
अन मनाच्या अंगणात, रहातात फुलत फुलत.नाती असतात कशी? गवताची पातीच जशी !
शब्दांच्या पावसात जी, रुजतात सलत सलत.

गवतां फुटती रानफुले, तसा वसंत नात्याचाही,
बहर एकदाच येऊनी, मग जातो विरत विरत.

पण वसंत सरताना, ठेवूनी जातो पाचोळा,
तोच मी करितो गोळा, धीर असतां गळत गळत.स्नेहबंधांचा अजब शेला, वेगवेगळ्या धाग्यातला,
बोलताना, ऐकताना, मन असतं विणत विणत.

एकीकडे लाविता ठिगळ, दुसरीकडे असते उसवत,
वस्त्र नात्यांचे सांभाळता, मन जातं क्षिणत क्षिणत.

धागा धाग्यात गुंतताना, नाही कोणता नियम,
बेधुंद्पणाच तो कायम, हे वस्त्र असता घडत घडत.जिंकावं पत्याचा डाव, नि खेळावयास बुद्धिबळ,
याचना करितो देवाजवळ, अभंगात डुलत डुलत.

मोक्ष नाही लोभ द्वेशा, बाळांसंगे पुनरपि उषा,
नि:श्वास शेवटचा येता, मात्र जाती सरत सरत.

सत्य हेच सांगते का? ही लाल ठिणग्यांची चट्चट,
चिता जेव्हा विझत जाते, काळासंगे जळत जळत.

- अनुबंध

मंगळवार, ७ जुलै, २००९

पाऊस वेगळा आज …....


पाऊस वेगळा राजा, हा पाऊस वेगळा आज,
नभातून बरसताना, नभालाच वाटे लाज.

आपुल्यात होते अंतर, अंतरात प्रीतीचा मतंर,
तो गुणगुणण्याला आता, चढला लज्जेचा साज.

सांगु आता कुणाला, मी मोडली अशी रीत,
अधीर झाली प्रीत, फिरला आतला आवाज.

त्या मुग्ध सांजवेळी, देहात सणाणली बिजली,
देव्हार्‍यातली वात विजली, त्या क्षणाला नाईलाज.

लागली चंद्राला काजळी, मेघ दाटले चांदण्यावरं,
पाऊस पातला धरेवरं, बाधित नक्षत्राचा आज.


- अनुबंध

मंगळवार, १६ जून, २००९

माझा एथुनच दंडवत .......


आला आषाढाचा मास, चार मास आता खास,
जाऊ द्येवाचीया गावा, विसराया सम्दा त्रास

न्हाई  चाकाचिये गाडी, न्हाई पुढं बैल जोडी,
वारकरी पाऊलं येडी, संग अभंगाची गोडी

जाती येका मागून येक, मैलामैलाची दगडं,
सैल पडती आपुली, संचिताची ही पकड

कुना करी दंग मृदंग, कोना हाती रंगे टाळ
त्यांच्या अवघ्या नादानं, थरथर कापतोया काळ

डोंगरावरी म्होटं अंगन, त्यावं धरलं रिंगन
घोडं घावती बेफाम , सारं हरपुनी भान

आली आली येकादशी, दिसला इठुचा कळस,
माझा एथुनच दंडवत, खाली ठेवुनिया तुळस

- अनुबंध

बुधवार, ३ जून, २००९

अडिवाळ


निज काया सोडूनि
होऊ कशी मी गाय ?
त्या ईवल्या वासराची
होऊ कशी मी माय ?

पोरके वासरू त्याच्या
मना मोठा क्षीण.
नाळ तुटताच गेली,
ओली बाळंतीण.

आभाळमायेचा पान्हा,
पुन्हा पुन्हा दाटून.
तो पान्हा बरसून,
गेलं पिल्लू गारठून.

ओल्या वासराचा,
ओला थरकाप.
गाईच्या बाळाला,
कावळीचा ही शाप.

उबदार अंगधार,
ओठी येणार कोठून ?
पाठीवरील चिलटे,
कोण घेईल चाटून ?

साऱ्यांना दूर सारीते,
होवुनि अडिवाळ.
देऊ कशी मी त्याला,
कूस लडिवाळ ?

- अनुबंध

रविवार, ३ मे, २००९

नाही कुणी रे शापितकधी येणारं वारं,
कधी जाणारं वारं,
नि देठाला अडकलेल्या,
पानांचा येरझारं |

अचानक थांबतो वारा,
आसमंत होई स्तब्ध,
सळसळणारी भिरभिरणारी,
पाने होती नि:शब्द |

शांततेत ह्या आहे,
एक अशांतता लपलेली
काळ येईल वाद्ळाने,
नेइल फुले झोपलेली |

तरुआईच्या काळजातले,
भय कधीच संपत नाही
खोडामधील डोळ्यांमधून
ती शून्यामध्ये पाही |

अखेर आलाच तो वारा,
विखुरला सुवास,
देठ सुटले आता,
सुरू वेगळा प्रवास |

पानांच्या तळ्व्यानी,
तरुआईचा निरोप,
अन् पेंगूळलेल्या डोळ्यांचा,
आईवरचा आरोप |

दूर चाललेल्या फुलांना,
आई ने सांगितले गुपित,
" हा नियम विश्वाचा,
नाही कुणी रे शापित |

जा जा बाळांनो,
नका ओरडु आई आई,
तुम्ही आई होईपर्यंत,
ही धरणी तुमची दाई | "

- अनुबंध

गुरुवार, २ एप्रिल, २००९

सिंधूचे पाणी खारेसूर्यास्थाकडे डोळे,वाळूत उभे पाय,
अन बिलगणार्‍या लाटांवर्ती,
पांढरी पांढरी साय.

आली शिंपले घेवून,लाट सागर किनारी,
झिजल्या अंगठ्यांचे तीर्थ,
पिवून परत जाणारी.

मोती शोधता शोधाता,पाय दुखावले झोंबले,
मोती वाहण्या आपुले,
शिंपले वाळूत थांबले.

थकून आता किनारी,पेलती दोन्ही वारे,
त्यांचे सुखदुख पिवून,
झाले सिंधूचे पाणी खारे.

- अनुबंध

शुक्रवार, २७ मार्च, २००९

गुढी पाडवा

संपली पानगळ, संपला शिशिर,
अन संपली ती गर्द अवस,
नवसुमने फ़ुलवीत आला,
वर्षाचा हा पहिला दिवस |

ढग सारून येणारी ती,
तेजोनिधिची नाजूक बोटे,
ललत चढवित स्वर त्या बोटांवर,
गळल्या पानां दरीत लोटे |

मातीचा मुग्ध सुगंध उधळीत,
अंगणे भिजविती गोल सडे,
मग त्या मातीला रंग चढवुनी
वसंत आनंद चोहिकडे |

दारोदारीच्या गुढ्या सजविती,
चैत्रातील शेंदूर फ़ुले,
गाठी गळ्यात मिरवित फ़िरती,
घरोघरीची बाल्यफ़ुले |

प्रसाद देव गुढीचा अन,
जिव्हेला जसा स्पर्श घडे,
गतवर्षीच्या दुख:क्लेषाचा,
निमिषातच तसा विसर पडे |

नवा रंग, नवा सुगंध,
नवा अभंग, देऊळी घुमे,
पांगुळ्ल्या क्षीणल्या मनाला,
नवा अर्थ, नवी दिशा गमे |

अनुबंध