सोमवार, २८ जून, २०१०

आला पाऊस गावात


आला पाऊस गावात
झाली दिवसाची रात
आणि अंधाऱ्या घरात
जळे दुपारची वात

आला पाऊस गावात
वारा सुटला जोरात
शीळ घालीत सुरात
निघे पानांची वरात

आला पाऊस गावात
वाजे ढगांचा नगारा
झाले पक्षी सैरावैरा
कुठे शोधती निवारा  ?

आला पाऊस गावात
त्याची आगळीच भाषा
ओढी नभावर रेशा
वाजे छतावर ताशा

आला पाऊस गावात
लव्हाळली ओली माती
नवकुसुमांच्या ज्योती
झाडाझुडपांच्या हाती

आला पाऊस गावात
दिसू लागली गांडूळे
लाल पैशाचे वेटोळे
किड्यामुंग्याचे सोहळे

आला पाऊस गावात
पाणी खेळले पाटात
धान्य रूजले शेतात
मोद मावेना उरात

आला पाऊस गावात
ज्वानी पडली प्रेमात
पावसाळी ह्या ज्वरात
आली नवती रंगात

आला पाऊस गावात
आला  कुणा न सांगता
त्याला पाहता पाहता
सुचू लागली कविता


 - अनुबंध

६ टिप्पण्या:

 1. चिंब कविता!!!
  मस्त.....आवडली

  अभिजीत-

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. फारच छान. ओल्या मातीच्या गंधाची आठवण झाली - नितीन

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. hey its so full of warmth and freshness , the poet has made himself a part of the poem and merged in every tit bits of the rainy season and its feeling , simplicity imbibed too :)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. Wa wa !! Khupach barik nirikshan ahe tuz ani tasach te shabdat pan kupach chaan mandale ahes !!
  Agadi asach paus amhi gavakadache manase anubhavto !!
  Mala mazya lahan panachi athvan karun dili hya kavitene !!

  ...Dipak

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. दिपक ........ कवितेवर मनापासून प्रेम करणारे तुझ्यासारखे निर्मळ मनाचे दोस्त भेटल्यामुळे खूप बरं वाटतं

  - अनुबंध

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. wonderful poem, bhavanaani chimb chimb bhijaleli.
  - Neelima Kulkarni
  (Don't know why it keeps on picking up my husband's name in profile. )

  प्रत्युत्तर द्याहटवा